वसई-विरार मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास विरारच्या अर्नाळाच्या समुद्रात 4 मुले वाहून गेल्याची माहिती आहे. विरारच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर ही मुलं खेळत असताना अचानक आलेल्या जोरदार लाटांच्या प्रवाहात 4 ही मुलं बाहून गेली. घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस, स्थानिक पोलीस प्रशासन तसेच जीवरक्षकांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
यानंतर तपास यंत्रणेकडून शोध मोहीम यु्द्ध पातळीवर सुरु झाली. बोटींच्या सहाय्याने समुद्रात शोधकार्य सुरू असून किनाऱ्यालगतच्या भागातही तपास केला जात आहे. यावेळी सुदैवाने 2 मुलांना वाचवण्यात यश आले असून 2 मुले अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे. बेपत्ता झालेली दोन्ही मुले नालासोपारा परिसरातील रहिवासी आहेत.
दरम्यान बाहेर काढण्यात आलेल्या 2 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. सध्या जोरदार पावसाचे वातावरण पुन्हा राज्यात पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमिवर समुद्रात येणाऱ्या भरतीचा विचार करून प्रशासनाकडून समुद्रकिनारी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.