पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात सोमवारी, 3 ऑगस्ट रोजी फेरीवाले व्यवसाय करणाऱ्या महिलांमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार वाद होऊन हाणामारी झाली. एकमेकींना ढकलाढकली, आरडाओरडा आणि मारहाण झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे. व्यावसायिक महिलांच्या हाणामारीमुळे घटनेमुळे दर्शनासाठी आलेले भाविक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.
हेही वाचा : Pune: आरोपींची बोनेटवर धिंड काढणे पुणे पोलिसांना भोवलं; मानवाधिकार आयोगाची मोठी कारवाई
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, व्यवसायाच्या जागेच्या कारणावरून हा वाद सुरू झाला आणि त्यानंतर महिलांनी एकमेकींवर धावून जात हाणामारी केली. उपस्थित नागरिकांनी आणि स्थानिकांनी मध्यस्थी करत महिलांना शांत केले. घटनेमुळे मंदिर परिसरातील हालचाली काही काळ विस्कळीत झाल्या. या प्रकारामुळे मंदिर परिसरातील फेरीवाल्यांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.