राहुल नगरमधील विश्वकर्मा कुटुंबाच्या घरात काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वादातून हिंसक घटना घडली होती. या प्रकरणात सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा 14 वर्षीय मुलगा श्लोक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधित घर सील केले होते. मात्र, आज पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास याच बंद घरातून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र तोपर्यंत घराचे मोठे नुकसान झाले होते.
विशेष म्हणजे, पोलिसांनी सील केलेल्या घरात आग नेमकी कशी लागली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आगीमागे शॉर्टसर्किट किंवा अन्य तांत्रिक कारण होते का, याचा तपास केला जात आहे. त्याचबरोबर या घटनेचा आधीच्या हत्याकांडाशी काही संबंध आहे का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.आगीत सिलिंडरचा स्फोट झाल्याने घटनास्थळी आणखी सतर्कता बाळगावी लागली. अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर पोलिसांनी परिसराची पाहणी केली. दरम्यान, सुनील विश्वकर्मा यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत आणखी दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.