वयाच्या चाळीशीनंतरही आपलं सौंदर्य आणि फिगर अगदी व्यवस्थित मेन्टेन करणाऱ्या टॉप सेलिब्रिटींमध्ये पहिलं नाव येतं, ते मलायका आरोराचं. मलायका बॉलिवूडमध्ये अभिनय करायला फारशी उत्सुक नसली, तरी ती जेव्हा आयटम साँग्ज करते, तेव्हा तिच्या चाहत्यांसाठी ती अगदी पर्वणी असते. ‘छय्या छय्या’ पासून ते ‘मुन्नी बदनाम’ पर्यंत अनेक गाण्यांवर मलायकाचा परफॉर्मंस लोकांनी उचलून धरलाय. आता पुन्हा एकदा आयटम साँगमधून मलायका प्रेक्षकांना घायाळ करायला सज्ज झालीय.
विशाल भारद्वाजच्या आगामी ‘पटाखा’ सिनेमात मलायका आरोरा एका आयटम साँगवर थिरकली आहे. “आजा नेटवर्क के भीतर कहके हैलो-हैलो” या गाण्याने एव्हाना लोकप्रियतेच्या यादीत वेगाने पुढे जातंय. या गाण्याचे शब्द आहेत गुलजार यांचे तर संगीत स्वतः विशाल भारद्वाज यांनीच दिलं आहे. हे गाणं गायलं आहे रेखा भारद्वाज यांनी. या गाण्याची कोरियाग्राफी गणेश आचार्य यांनी केलीय.
हे गाणं यूट्यूबवर रीलिज केल्यावर अवघ्या 3 दिवसांतच या व्हिडिओला 19 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘पटाखा’ चित्रपट दोन बहिणींच्या नात्यावर आधारीत आहे. राजस्थानी लेखक चरण सिंह ‘पथिक’ यांच्या कथेचा ‘पटाखा’ चित्रपटावर प्रभाव आहे. ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा आणि टीवी अभिनेत्री राधिका मदान या दोघी जणी बहिणींच्या मुख्य भूमिकेत आहेत. तर सुनील ग्रोवर, विजय राज आणि सानंद वर्मा यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 28 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.