नागपूर: विदर्भात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. भारतीय हवामान विभागाने नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य पूरस्थिती आणि अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी परिस्थितीचा आढावा घेत सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच 29 जुलै रोजी नागपूर शहर, ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
हवामान विभागाने 29 जुलैसाठी नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय 30 जुलैलाही नागपूरसह अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज कायम असल्याने ऑरेंज अलर्ट लागू राहणार आहे.
गेल्या 24 तासांत विदर्भातील अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे 139 मिमी तर गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे 103.4 मिमी पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर नदी-नाले आणि जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नागपूर शहरात सकाळपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. प्रतापनगर येथील सोमलवार शाळेच्या मैदानातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे. शाळा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा त्रास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याने दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मेघगर्जना सुरू असताना उघड्यावर न थांबणे, झाडाखाली आश्रय न घेणे तसेच नदी, नाले, पूरग्रस्त भाग आणि पाण्याचा वेग असलेल्या ठिकाणांपासून दूर राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथके, महसूल विभाग, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.