Sindhudurg: मंदिर नाही, मूर्ती नाही तरी हजारो भाविक श्रद्धेने येतात; मानसीश्वर जत्रेचं रहस्य काय?

सिंधुदुर्गातील वेंगुर्ले येथे साजरी होणारी श्री देव मानसीश्वराची जत्रा शांतता, श्रद्धा आणि निसर्गाच्या सान्निध्यात पार पडते.

Sindhudurg: मंदिर नाही, मूर्ती नाही तरी हजारो भाविक श्रद्धेने येतात; मानसीश्वर जत्रेचं रहस्य काय?

जत्रा म्हटलं की सहसा डोळ्यांसमोर येतो तो प्रकाशाचा झगमगाट, ढोल-ताशांचा गजर आणि लाउडस्पीकरवरचे कर्कश आवाज. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे दरवर्षी साजरी होणारी श्री देव मानसीश्वराची जत्रा या सगळ्यांपासून पूर्णपणे वेगळी आहे. इथे ना प्रचंड रोषणाई, ना गोंगाट-तरीही हजारो भाविक श्रद्धेने येथे येतात.

कुडाळ-वेंगुर्ले मार्गावर वेंगुर्ले शहराच्या सीमेपाशी मांडवी खाडीच्या काठावर हे देवस्थान वसले आहे. मानसीश्वर किंवा देव मानसीच्या देवचाराचं हे स्थान पाहिल्यावर अनेकांना आश्चर्य वाटतं. कारण इथे पारंपरिक अर्थाने मंदिर नाही, गाभारा नाही, मूर्तीही नाही. सुमारे पंधरा फूट चौरस आकाराचं बांधकाम आणि त्यावर फडकणाऱ्या असंख्य भगव्या निशाण्याच इथं देवस्थानाची ओळख सांगतात.

जत्रेच्या दिवशी या भगव्या निशाण्यांचं सौंदर्य अधिकच खुलतं. भाविक बांबूच्या काठ्यांवर भगवे झेंडे लावून देवस्थानाकडे येतात. परिसरात जिकडे नजर जाईल तिकडे भगव्या पताका वाऱ्यावर डोलताना दिसतात. हा देखावा पाहताना मन नकळत शांत होतं आणि श्रद्धेची भावना अधिक गडद होते.

मानसीश्वराची जत्रा ही केवळ स्थानिक मर्यादित नसून, मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव अशा विविध भागांतून भाविक येथे येतात. अनेक जण नवसपूर्तीसाठी खास या दिवशी उपस्थित राहतात. काही भाविक जिवंत खेकडे नवस म्हणून अर्पण करतात, ही इथली एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. त्यामुळे हे देवस्थान अत्यंत जागृत मानले जाते.

या जत्रेचं आणखी एक आकर्षण म्हणजे कोकणातील पारंपरिक दशावतार नाट्य. आधुनिक प्रकाशव्यवस्था किंवा मोठ्या साउंड सिस्टीमशिवाय, पेट्रोमॅक्सच्या दिव्यांच्या प्रकाशात हा खेळ सादर केला जातो. त्या मंद उजेडात रंगणारा दशावतार पाहणं हा अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे. लोककला, श्रद्धा आणि निसर्ग यांचा अनोखा संगम इथे पाहायला मिळतो.

देवस्थानाचा परिसर झाडी, पाणी आणि मोकळ्या हवेत वेढलेला आहे. त्यामुळे जत्रेच्या काळातच नव्हे, तर वर्षभर पर्यटक आणि भाविक इथे शांततेचा अनुभव घेण्यासाठी येतात. धावपळीच्या जीवनातून काही वेळ दूर राहून मनाला विश्रांती देण्यासाठी हे स्थान अनेकांसाठी खास ठरतं.

गोंगाटापेक्षा शांतता, झगमगाटापेक्षा श्रद्धा आणि भव्यतेपेक्षा साधेपणाला महत्त्व देणारी वेंगुर्ले मानसीश्वराची जत्रा ही कोकणाच्या संस्कृतीचं जिवंत उदाहरण आहे. म्हणूनच ही जत्रा केवळ धार्मिक नव्हे, तर सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number