जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी मार्केटला गुरूवारी सकाळी गोडाऊनचे स्वरूप आल्याचे पहावयास मिळाले. गुरुवारी भाजी मार्केटमध्ये सकाळी 6 वाजेपर्यत 502 वाहनातून भाज्या विक्रीसाठी आल्या. काल महाराष्ट्र बंद असतानाही भाजी मार्केटमध्ये तब्बल 636 वाहनातून भाज्या विक्रीसाठी आल्या होत्या.
दररोजच्या तुलनेत भाजी मार्केटमध्ये दिवसभरात जेमतेम 25 ते 30 टक्केच ग्राहक आल्याने गाळ्यावर भाज्यांची पोती तशीच पडून होती. पालेभाज्या खराब झाल्याने त्या मोठ्या प्रमाणावर फेकून द्यावे लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सुरण, टॉमटो, डांगर,दुधी भोपळा, बीट, वाटाणा, वांगी, पडवळ,आले, मिरची, लिंबू यासह अन्य भाज्या या तात्काळ शीघ्र नाशिवंत प्रकारात मोडत नसल्याने कालची आवक गाळ्यावर तशीच पडून होती. त्यात आजच्या भाज्यांची आवक भर पडली. मात्र, आज सकाळी 6 वाजल्यापासून ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे भाज्या विकल्या जाणार असल्याचे व्यापार्यांकडून सांगण्यात येत आहे.