सध्या देशभरात इंधन टंचाईचे सावट आहे. पंतप्रधानांनी जनतेला इंधनाचा कमी वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी एअर इंडियाने तिकिटदरांमध्ये मोठी वाढ केली होती. त्यामुळे हवाईप्रवास मोठ्या प्रमाणात महागला होता. अशातच आता हवाई कंपन्यांसाठी आणि हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्र सरकारने एका महत्त्वपूर्ण निर्णयात, विमान इंधनावरील (एटीएफ) मूल्यवर्धित कर (व्हॅट) 18 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. ही कपात शुक्रवारपासून लागू झाली आहे. पश्चिम आशियातील सध्याच्या संकटामुळे वाढणारा परिचालन खर्च आणि विमान भाड्यावरील दबाव कमी करण्याच्या उद्देशाने घेतलेला हा निर्णय, विमान कंपन्या आणि सामान्य प्रवासी या दोघांसाठीही मोठा दिलासा ठरेल.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरपू राममोहन नायडू यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही बातमी शेअर केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. नायडू यांनी याला "वेळेवर केलेला हस्तक्षेप" म्हटले. ते म्हणाले की, जागतिक आव्हानांच्या काळात विमान भाडे नियंत्रणात ठेवण्यात हा निर्णय महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
मंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात 16 कार्यरत विमानतळे असून देशात सर्वाधिक हवाई वाहतूक येथे होते. राज्यातून दरवर्षी अंदाजे 75 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात, ज्यात दररोज सुमारे2 लाख प्रवाशांचा समावेश आहे. व्हॅटमधील कपातीमुळे सर्व विमानतळांवरील विमानसेवा सुलभ होईल आणि मोठ्या संख्येने प्रवाशांना फायदा होईल.