मुंबई, ३ जून २०२३, प्रतिनिधी : मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती येत आहे. खरंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान सुरू होणारी ही हायस्पीड ट्रेन ३ जून २०२३ रोजी शनिवारी अर्थातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सीएसएमटी मडगाव वंदे भारत ट्रेन ला आज हिरवा बावटा दाखवणार होते. या उद्घाटनकार्यक्रमासाठी गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
मात्र आता हा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पंतप्रधान मोदी सीएसएमटी मडगाव वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार नाहीत. आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, ओडिसा येथील बालासोर जिल्ह्यात तीन रेल्वे गाड्यांचा अपघात झाला आहे. या भीषण रेल्वे दुर्घटनेमध्ये अनेक रेल्वे प्रवाशी मृत्युमुखी पडण्याची भीती आहे. काल शुक्रवारी सायंकाळी उशिराने ही घटना घडली आहे. यामुळे या भीषण दुर्घटनेनंतर सीएसएमटी मडगाव वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. दरम्यान आता मुंबई गोवा वंदे भारत ट्रेन केव्हा सुरू होणार याबाबत प्रवाशांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हा उदघाटनाचा कार्यक्रम अचानक रद्द झाला असल्याने आता केव्हा उद्घाटन होईल या संदर्भात अद्याप माहिती हाती आलेली नाही. मात्र लवकरच रेल्वे कडून या सीएसएमटी मडगाव वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्याची पहिली वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता. मुंबई-मडगाव ही भारतातील १९ वी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. मुंबई ते मडगाव हे अंतर वंदे भारत एक्स्प्रेस सात तास ५० मिनिटात पूर्ण करणार आहे.