Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीला जाताय? मग हे नियम नक्की वाचा, कार्ड मिळाल्यावर ‘इतक्या’ वेळात सुरू करावी लागेल यात्रा

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर माता वैष्णो देवी यात्रेसाठी श्राइन बोर्डने नवे नियम लागू केले आहेत.

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीला जाताय? मग हे नियम नक्की वाचा, कार्ड मिळाल्यावर ‘इतक्या’ वेळात सुरू करावी लागेल यात्रा

जम्मू काश्मीर: माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी नववर्षाच्या निमित्ताने भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता, 'श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्ड'ने यात्रा नियमांमध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता भाविकांना 'आरएफआयडी' यात्रा कार्ड मिळाल्यानंतर जास्तीत जास्त 10 तासांच्या आत आपली यात्रा सुरू करणे बंधनकारक असेल.

 इतकेच नव्हे तर, दर्शन पूर्ण केल्यानंतर 24 तासांच्या आत कटडा बेस कॅम्पला परतणेही अनिवार्य करण्यात आले आहे. हे नियम तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. नववर्षापूर्वीच प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने, मार्गावरील गर्दीचे नियोजन, सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.

यापूर्वीच्या नियमांनुसार, RFID कार्ड मिळाल्यानंतर यात्रा सुरू करण्यासाठी कोणतीही कठोर कालमर्यादा नव्हती. भाविक आपल्या सोयीनुसार कधीही प्रवासाला सुरुवात करू शकत होते आणि परतण्यासाठीही कोणतेही बंधन नव्हते. यामुळे अनेकवेळा भाविक 'भवन' परिसरात अनेक दिवस मुक्काम करत असत, परिणामी मार्गावर आणि दर्शन रांगेत मोठी गर्दी (Overcrowding) निर्माण व्हायची. मात्र, नव्या नियमांमुळे या अनियंत्रित गर्दीला चाप बसणार आहे.

हेही वाचा: Tigress Airlifted : प्रथममच वाघिणीला एअरलिफ्ट करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या एमआय-17 हेलिकॉप्टरचा वापर; वाघिणीचे पेंचमधून राजस्थानला स्थलांतर

कटडा ते भवन या 13 किमीच्या प्रवासासाठी सामान्यतः 12 ते 24 तास लागतात. हेलिकॉप्टरने हे अंतर चार ते सहा तासांत पूर्ण होते, तर पायी प्रवासासाठी वर जाण्यास सहा ते आठ तास आणि खाली येण्यास तितकाच वेळ लागतो. गर्दीच्या काळात दर्शनासाठी दोन ते सहा तास लागू शकतात. एकूणच, एक सामान्य यात्रा 24 ते 36 तासांत पूर्ण होते, परंतु नववर्षाच्या गर्दीत हा काळ 48 तासांपर्यंत वाढू शकतो. प्रवासाच्या साधनांमध्ये पायी चालण्याव्यतिरिक्त बॅटरी कार, घोडा, पिट्ठू आणि हेलिकॉप्टरची सोय उपलब्ध आहे. या सर्वांसाठी श्राइन बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावरून 'ऑनलाइन नोंदणी' करणे अनिवार्य आहे.

भाविकांना वैष्णो देवीला पोहोचण्यासाठी जम्मू तवी हे मुख्य रेल्वे स्टेशन आहे, जे देशाच्या सर्व भागांशी जोडलेले आहे. तिथून कटडा 50 किमी अंतरावर असून बस किंवा टॅक्सीने दीड तासांत पोहोचता येते. हवाई मार्गाने येणाऱ्यांसाठी जम्मू विमानतळ (70 किमी) जवळ पडते. रस्ते मार्गाने जम्मू किंवा पठाणकोटवरून खाजगी वाहने किंवा बसने कटडा गाठता येते. बोर्डाने भाविकांच्या सोयीसाठी कटडा रेल्वे स्टेशन येथील नोंदणी केंद्र आता रात्री 12 वाजेपर्यंत उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या नियमामुळे भाविकांना अनेक फायदे होणार आहेत. गर्दीचे योग्य नियोजन झाल्यामुळे प्रवासाचा मार्ग सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहील. यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि आजारपण किंवा खराब हवामानासारख्या आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य (Rescuing) जलद गतीने करणे शक्य होईल. विशेषतः महिला, मुले आणि वृद्धांसाठी ही यात्रा आता अधिक सुरक्षित होईल. दर्शन प्रक्रिया वेगवान होऊन रांगा कमी होतील. भाविकांना त्रास देणे हा या नियमाचा उद्देश नसून, त्यांचे दर्शन सुरक्षित आणि सुखकर करणे हाच मुख्य हेतू असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: Hindi Language Compulsion : दिल्लीत हिंदीचा डंका, मग मुंबईत मराठी भाषेचा संकोच का?; परदेशी नागरिकाला नगरसेविकेची तंबी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number