सोलापूर शहरात पहिल्यांदाच मशिदीमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहरातील तेलंगी पच्चा पेठ येथील जेलरोड परिसरात असलेले नूरे इस्लामी मस्जिद ट्रस्टच्यावतीने मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मुस्लिम समाजामध्ये कोरोना लसीकरणाबाबत गैरसमज पसरल्यामुळे अनेक मुस्लिम नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे सोलापूरमध्ये पहिल्यांदाच मशिदीमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. मशिदीचे मौलवी, ट्रस्टी, प्रभागातील नगरसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर महानगरपालिकेने मशिदीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण शिबिरात ४०० नागरिकांनी कोरोना लस घेतली. तसेच या लसीकरणाच्या शिबिरामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यास मदत झाली.
कोरोना परिस्थिती स्थिरावत असतानाच ओमायक्रॉन विषाणूने डोकं वर काढले आहे. तसेच जगभरात ओमायक्रॉन विषाणूचा उद्रेक वाढत असून देशात ओमायक्रॉन विषाणूने शिरकाव केला आहे. तर महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरात लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. तर सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी लसीकरण मोहिम सुरू आहे. दरम्यान सोलापूर शहरात पहिल्यांदाच मशिदीमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
भारतातही ओमायक्रॉन विषाणूने शिरकाव केला असून देशात एकूण १६० रुग्ण ओमायक्रॉनबाधित आहेत. देशातील ११ राज्यात ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार झाला आहे. तसेच महाराष्ट्रात ओमायक्रॉन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात ५४ रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. तसेच महाराष्ट्रात रविवारी ओमायक्रॉनचे ६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर या ६ रुग्णांपैकी चार रुग्ण मुंबईचे असल्याचे निदान समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ५४ रुग्णांपैकी सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईती आढळले आहेत. त्यामुळे प्रशासन चिंतेत आले असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.