विदेशी दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीकरणात मागे पडलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांसोबत लसीकरणाचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी घरघरात लसीकरण मोहिम राबवण्यासाठी ‘हर घर टिका, घर घर टिका’चा मंत्र दिला आहे. विकसित देशात पुन्हा कोरोनाचे संकट आल्यामुळे आपल्याला लसीकरणात कठोर राहण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. तसेच राज्यातील नागरिकांनी १०० टक्के लसीकरणावर भर देण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले आहे.
कोरोना विषाणूपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारपर्यंत १०७ कोटीहून अधिक नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे. विदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लसीकरणाचा आढावा घेतला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी ४० जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील या आढावा बैठकीत उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आढावा बैठकीदरम्यान प्रत्येक नागरिकाच्या घराघरांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्याचे आवाहन केले आहे. विकसित देशात पुन्हा कोरोनाचे संकट आल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्यासही पंतप्रधानांनी सांगितले आहे. तसेच कोरोना काळात लसीकरण काळात मदत करणाऱ्या महिला कर्माचाऱ्यांचे कौतुक केले.