वॉशिंग्टन: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आता इराण विरोधात संभाव्य भूदल कारवाईच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. द वॉशिंग्टन पोस्ट च्या अहवालानुसार, पेंटागन अनेक आठवडे चालू शकणाऱ्या मर्यादित ग्राउंड ऑपरेशनची आखणी करत आहे. दरम्यान, हजारो अमेरिकन सैनिक आणि मरीन दल मध्य पूर्वेत तैनात करण्यात आले असून, अंतिम निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे.
या संभाव्य कारवाईत मोठ्या प्रमाणावर आक्रमणाऐवजी मर्यादित आणि लक्ष्यित छापेमारीवर भर दिला जाणार आहे. विशेष दल (स्पेशल ऑपरेशन फोर्स) आणि सैनिकांच्या मदतीने संवेदनशील ठिकाणांवर अचूक कारवाई करण्याची रणनीती आखली जात आहे. ही योजना अत्यंत गोपनीय स्वरूपाची असून, गेल्या काही आठवड्यांपासून तिची तयारी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मात्र, या ऑपरेशनदरम्यान अमेरिकन सैनिकांसमोर गंभीर धोके उभे राहू शकतात. इराणकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले, जमिनीवरील गोळीबार तसेच आयईडी (इम्प्रोवाइज्ड स्फोटके) यांचा धोका कायम राहणार आहे. त्यामुळे ही कारवाई लष्करीदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक मानली जात आहे.
हेही वाचा: Expiry Date की Best Before? छोटासा फरक, पण आरोग्यासाठी मोठा धोका; खरेदी करताना नक्की वाचा
दरम्यान, प्रशासनात विविध पर्यायांवर चर्चा सुरू असून, खार्ग आयलंड वर नियंत्रण मिळवण्याची शक्यता देखील तपासली जात आहे. फारसच्या आखातातील हे बेट इराणच्या तेल निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय हॉर्मुझ सामुद्रधुनी जवळील किनारी भागात छापेमारी करून संभाव्य धोकादायक शस्त्रसाठा नष्ट करण्याचीही योजना विचाराधीन आहे.
या ऑपरेशनच्या कालावधीबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. काही अधिकाऱ्यांच्या मते ही कारवाई काही आठवड्यांत पूर्ण होऊ शकते, तर काहींच्या मते ती काही महिन्यांपर्यंत चालू शकते. एकीकडे तणाव कमी होत असल्याचे संकेत दिले जात असताना, दुसरीकडे संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारली जात नाही.
व्हाईट हाऊसकडूनही कठोर भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. प्रशासनाने इराणला इशारा दिला आहे की, जर त्यांनी अणु कार्यक्रम थांबवला नाही आणि अमेरिकेला तसेच त्यांच्या मित्रदेशांना धोका देणे सुरूच ठेवले, तर कठोर लष्करी कारवाई करण्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही. त्यामुळे येत्या काळात पश्चिम आशियातील परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.