बुधवारपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. तसेच शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे याचा परिणाम शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनावर होणार आहे.
नाशिकमध्ये शुक्रवारपासून मराठी साहित्य संमेलन सुरू होणार आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. मात्र बुधवारपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच सलग दुसऱ्या दिवशीही नाशिकमद्ये पावसाच्या सरी सुरू आहेत. पावसामुळे नाशिकमधील मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपात पाणी साचले आहे. संमेलनाच्या मुख्य मंडपातच चिखल साचल्याने आयोजक चिंतेत आले आहेत. तसेच खुल्या जागी होणारे संमेलनाचे अनेक कार्यक्रमही अडचणीत आले आहेत.
येत्या ३, ४ आणि ५ डिसेंबर दरम्यान मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. तसेच या संमेलनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नामांकित अतिथी येणार आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या देखरेखीखाली संमेलनाची तयारी सुरू आहे.
नाशिकसह जिल्ह्यात बुधवार सकाळपासून ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस बरसला. अवेळी आलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक द्राक्षबागेत पाणी साचल्याने द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.