महाराष्ट्रात अवकाळी पावसासह गारपीटाचं संकंट येण्याची शक्यता आहे. राज्यात 9 एप्रिलपर्यंत अवकाळी गापरपीटीची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे. त्यानुसार शनिवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात सकाळीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतमालाचे मोठं नुकसान झालं.
सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे अवकाळी सरी बरसण्याची दाट शक्यता होती. आणि शनिवारी सकाळच्या सुमारास पंढरपुरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पंढरपूर शहर आणि तालुक्यात मोठा पाऊस झाला. त्यामुळे अनेक फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा चिंतेत आहे.
नाशिकमधील सटाणा तालुक्यातील आखतवाडे परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. राज्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कांद्यासह शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची शेताच्या बांधावर जात पाहणी केली. यावेळी, अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला दिलासा देत शासनाकडून नुकसानीची भरपाई मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.बोरसे यांनी सांगितले.
राज्यात 9 एप्रिलपर्यंत अवकाळीसह गारपीटीची शक्यता आहे. तर, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये मेघकर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच, हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.