अहिल्यानगर: उन्हाच्या झळांनी रान तापले असताना, अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि बळीराजाच्या सुखी संसारावर अक्षरशः आभाळ फाटले. पीक चांगले आले या आनंदात असतानाच अवकाळीने महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीवर निर्दयी नांगर फिरवला आहे. एका बाजूला लग्नसराई आणि सणवार, तर दुसऱ्या बाजूला शेतात डोळ्यादेखत कुजणारे पीक, अशा भीषण कात्रीत शेतकरी सापडला असून, हे केवळ पावसाचे थेंब नसून बळीराजाच्या रक्ताचे पाणी झालेल्या कष्टाचे अश्रू आहेत. निसर्गाच्या या लहरीपणाने पुन्हा एकदा ग्रामीण महाराष्ट्राचे आर्थिक कंबरडे मोडून काढले आहे.
कृषी विभागाने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, राज्यावर ओढवलेले हे संकट केवळ एका भागापुरते मर्यादित नसून त्याचा विस्तार तब्बल 29 जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. 14 मार्च ते 2 एप्रिल या अवघ्या काही दिवसांच्या कालावधीत अस्मानी संकटाने राज्याचे जवळपास 2 लाख 4 हजार 835 हेक्टर क्षेत्र बाधित केले आहे. रक्ताचे पाणी करून वाढवलेले पीक आता चिखलात माखले असून, डोळ्यासमोर उध्वस्त झालेल्या पिकाकडे पाहून शेतकऱ्याचा कंठ दाटून आला आहे.
या संकटाचा सर्वाधिक तडाखा उत्तर महाराष्ट्राला बसला असून नाशिक, अहिल्यानगर, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांचे चित्र विदारक आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 30 हजार 448 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यापाठोपाठ अहिल्यानगरमध्ये 23 हजार 633 हेक्टर आणि जळगावमध्ये 22 हजार 361 हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यातील 14 हजार 832 हेक्टर, बुलढाणा येथील 8 हजार 507 हेक्टर आणि छत्रपती संभाजी नगरमधील 8 हजार 445 हेक्टर क्षेत्रावरील पिकेही पावसाने आणि गारपिटीने भुईसपाट केली आहेत.
नुकसानीची ही व्याप्ती राज्याच्या इतर भागांतही तितकीच गंभीर आहे. सोलापूरमध्ये 2 हजार 439 हेक्टर, पुण्यातील 1 हजार 785 हेक्टर आणि जालना जिल्ह्यातील 1 हजार 692 हेक्टर क्षेत्रावर अवकाळीने घाला घातला आहे. याशिवाय धाराशीवमध्ये 1 हजार 407 हेक्टर, अकोल्यात 931 हेक्टर, अमरावतीत 696 हेक्टर आणि नांदेड जिल्ह्यातील 502 हेक्टरवरील शेती बाधित झाली आहे. या अनपेक्षित आघाताने संपूर्ण राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असून, निसर्गाच्या या खेळात मानवी प्रयत्न पुन्हा एकदा तोकडे पडताना दिसत आहेत.
नुकसानीचे हे स्वरूप केवळ पारंपरिक पिकांपुरते मर्यादित नसून, बागायती आणि नगदी पिकांचीही मोठी हानी झाली आहे. केळी, गहू, मका आणि हरभऱ्यासह आंब्यासारखा 'फळांचा राजा'ही झाडावरून जमिनीवर लोळला आहे. ज्वारी, टरबूज, कलिंगड, डाळिंब, कांदा, संत्रे आणि द्राक्षांसारख्या फळांना अवकाळीने मातीमोल केले आहे. बाजारपेठेत भाव मिळण्यापूर्वीच भाजीपाल्याचेही अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्याच्या वर्षभराच्या नियोजनाची पूर्णपणे राखरांगोळी झाली आहे.
पंचनाम्यांची औपचारिकता लवकरात लवकर पूर्ण करून मदतीचा ओघ थेट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. निसर्गाशी दोन हात करणारा शेतकरी आज हतबल झाला आहे, त्याला या अस्मानी संकटातून सावरणे हे प्रशासनासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.