उन्हाळ्याची तयारी सुरू असताना राज्यातील अनेक भागांत पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील हवामान चित्रच बदलले आहे. अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून गहू, कांदा तसेच इतर पिकांना फटका बसला आहे. कोकण विभागातील मुंबई, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या सोबतच उष्णताही जाणवेल. तर ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पावसाचा मुक्काम आजही कायम राहणार आहे. पुढील 24 तासासाठी पुणे हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला असून, पुढील दोन दिवस दुपारनंतर किंवा सायंकाळी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दुपारी उन्हाचा चटका जाणवेल. त्यानंतर अवकाळी पावसाचा जोर ओसरेल आणि घटलेल्या कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अवकाळी गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. या गारपिटीमुळे संपूर्ण परिसर पांढराफटक पडल्याचे चित्र पाहायला मिळत असून अनेक ठिकाणी गारांचे मोठमोठे ढीग साचले आहेत.
हेही वाचा- Blast outside BJP office : मोठी बातमी! भाजप मुख्यालयाबाहेर स्फोट, व्हायरल व्हिडिओमुळे संबंधीत व्यक्ती….
तसेच विदर्भात नागपूर, वर्धा आणि बुलढाणामध्ये हवामान विभागाने अवकाळी पावसाचा वर्तावला आहे. यावेळी हवामानखात्याने नागपूरसह विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता, त्यानुसार दोन दिवसापासून आकाशात ढगांची गर्दी पाहायला मिळत होती. त्यानंतर उपराजधानी नागपुरात आज रात्री देखील जोरदार पावसाची हजेरी लागण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह रात्री आलेल्या पावसामुळे नागपूरकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. वर्ध्यातील काही भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतातील गहू, हरभरा, भाजीपाल्यांसह फळबागाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करू लागला आहे.
उत्तर महाराष्ट्रात अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, नंदूरबार, नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे. या गारपीटीमुळे साक्री तालुक्यात कांदा, मका, गहू, टरबूज,पपई, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. गारपिटीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जनजीवनही विस्कळीत झाले आहे. या अवकाळी पावसामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या अधिक वाढल्या आहेत.