उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे मोठा रेल्वे अपघात टळल्याची घटना समोर आली आहे. उज्जैनी एक्सप्रेस शंटिंगदरम्यान अचानक अनियंत्रित झाल्याने इंजिन आणि काही डबे रुळावरून घसरले. ही घटना ऋषिकेशमधील खांड गावाजवळील स्टेशन यार्ड परिसरात घडली. सुदैवाने त्या वेळी ट्रेन पूर्णपणे रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 14317 उज्जैनी एक्सप्रेसची स्टेशन यार्डमध्ये शंटिंग सुरू होती. पहाटे सुटणाऱ्या या गाडीची नियमित हालचाल सुरू असतानाच अचानक ट्रेनचा ताबा सुटला आणि ती वेगाने पुढे गेली. यानंतर इंजिनाने यार्डमधील भिंत तोडली आणि इंजिनासह काही कोच रुळावरून खाली उतरले.
#WATCH | Rishikesh, Uttarakhand | Morning visuals from the spot where three coaches of the Ujjaini Express derailed in the Khand village area near the Yog Nagari Rishikesh Railway Station yesterday night. No passengers were on board the train at the time of the accident. pic.twitter.com/TRjraIEi1G — ANI (@ANI) May 19, 2026
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. रेल्वे अधिकारी आणि आरपीएफचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक महेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिनाचे चाक रुळावरून घसरले असून संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात ब्रेक सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शंटिंगदरम्यान अचानक ब्रेक नीट काम न केल्यामुळे ट्रेन अनियंत्रित झाल्याचा अंदाज आहे. मात्र नेमके कारण काय होते, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
आरपीएफ अधीक्षक सरोज कुमार यांनी सांगितले की, रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस आणि तांत्रिक विभागाची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. सकाळी सहा वाजता गाडी सुटणार असल्याने त्याआधी शंटिंग प्रक्रिया सुरू होती. त्या वेळी ट्रेनमध्ये एकही प्रवासी नव्हता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेनंतर रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणा आणि तांत्रिक तपासणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वेळेत ही घटना रिकाम्या ट्रेनसोबत घडल्याने मोठा अपघात टळला, अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकली असती. सध्या रेल्वे प्रशासनाकडून नुकसानाचा आढावा घेतला जात असून पुढील तपास सुरू आहे.