मुंबई, १९ जून २०२३ , प्रतिनिधी : मुंबई येथील ठाकरे गटाच्या राज्यव्यापी शिबिरात बोलताना उध्दव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं होतं. यावेळी देवेंद्रजी तुमची परिस्थिती फार हलाखीची आहे हो!, तुम्ही बोलताय ठीक आहे, पूर्वी जाहिरात यायची. पण आता सहनही होत नाही, सांगता ही येत नाही, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस अशा शब्दांत ठाकरे यांनी फडणवीसांना निशाणा साधला होता. या टीकेला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला येथील कार्यक्रमात बोलत होते.यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंच्या टीकेवर जोरदार पलटवार केला.फडणवीस म्हणाले, मी विधानसभेत ठणकावून सांगितलं होतं, मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेवा, मै समंदर हूँ, लौटकर जरुर आऊंगा आणि मी परत आलोच शिवाय येताना सोबत शिंदेंना घेऊन आलो. आणि हे अजूनही भाषणंच ठोकताहेत.यांच्या पक्षातून रोज लोक निघून जाताहेत. यांच्या नाकाखालून ४०-४० आमदार निघून गेले तरी यांना समजतही नाही.
दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी यांनी ज्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ येईल त्यादिवशी मी शिवसेनेचं दुकान बंद करुन टाकेन. पण २०१९ ला उध्दव ठाकरे सत्तेसाठी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. आणि याचमुळे आम्ही ठाकरेंचं दुकान बंद केलं असं आणि बाळासाहेबांचा पक्ष पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली उभा केला असं प्रत्युत्तरही फडणवीसांनी ठाकरेंना दिलं.
पुढे फडणवीस म्हणाले,”जगामध्ये ५ देश कोविडची लस बनवू शकले, त्यामध्ये भारत हा एक देश आहे. मोदीजींनी लस दिल्यामुळे आज आपण जिवंत आहोत. पंतप्रधान मोदी यांनी १०० देशांना लस दिली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मोदींना बॉस म्हणतात. १२० देशाचे प्रमुख म्हणतात जगात आमचा आवाज तुम्ही आहात. सगळ्या आखाती देशांनी एकत्रित येऊन त्यांच्या सर्वोच्च सन्मान त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिला. हा खऱ्या अर्थाने भारताचा सन्मान आहे. देशभरातील विरोधक पाटण्याला एकत्र येणार आहेत, हातात हात घेणार आहेत आणि ‘मोदी हटाओ’च्या घोषणा देणार आहेत. आता त्यांच्यात एक नेता वाढला आहे. तो म्हणजे उद्धव ठाकरे. मात्र कितीही वेली एकत्र आल्या तरी त्या वटवृक्ष होऊ शकत नाही. वटवृक्ष एकच असतो त्याचं कुणीही वाकडं करु शकत नाही, “असं फडणवीस म्हणाले .