एकनाथ शिंदेंसह आमदार, खासदारांच्या बंडखोरीनंतर दुभंगलेल्या पक्षाच्या नव्याने बांधणीसाठी उध्दव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. इतर पक्षातील नेत्यांच्या पक्षप्रवेशासह जाहीर सभांचा धडाका लावला आहे. एकीकडे महाविकास आघाडीतर्फे राज्यभरात वज्रमूठ सभेद्वारे शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात असतानाच दुसरीकडे ठाकरे यांनी देखील जाहीर सभा घेत शिंदे गटासह भाजपचा समाचार घेतला जात आहे.
आता खेड, मालेगाव येथील सभेनंतर आता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे रविवारी सायंकाळी ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जळगाव दौऱ्यावर येत आहेत. यामुळे ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. एकीकडे शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर जळगावमधील चार आमदार शिंदे गटाची वाट धरली. तसेच गुलाबराव पाटलांकडून ठाकरे गटावर निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी ठाकरे गटानं कंबर कसली आहे.