चंद्रकांत पाटलांनी बाबरी मशीदीच्या मुद्यावर खळबळजनक वक्तव्य केल्याने उद्धव ठाकरेंनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानंतर आता मनसेच्या ट्विटर हँड्लवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.
बाबरी मशीदीबाबत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन सेनाभवनमध्ये झाला हे म्हणणं चुकीचं आहे. बाबरी मशीद पाडकामाचं नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने केलं होतं असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त दावा केला. या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये चंद्राकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच त्या दिवशी घडलेला प्रसंग देखील त्यांनी या वेळी सांगितला. हाच प्रसंग सांगणारा व्हिडीओ राज ठाकरे यांनी पुन्हा शेअर करत दुजोरा दिला आहे.
मनसेने ट्विट केलेल्या व्हिडिओत राज ठाकरे म्हणतात की, मला तोही प्रसंग आठवतो ज्यावेळी मी खोलीत खाली बसलो होतो. त्यावेळी बाबरी मशिद पडली होती. दुपारची वेळ होती. दिड दोन तासांनी बाळासाहेब ठाकरेंना फोन आला. त्यांनी बाळासाहेबांना प्रश्न विचारला की, येथे कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. पण भाजपचे सुंदलाल भंडारी म्हणत आहेत की, ही गोष्ट भाजप किंवा भाजपच्या लोकांनी केली नाही. कदाचित ती शिवसैनिकांनी केली असेल. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले की, ही गोष्ट जर शिवसैनिकांनी केली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. त्यावेळी, त्या क्षणाला एक जबाबदारी अंगावर घेणे ही किती महत्वाची गोष्ट होती.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक-एक जण बिळातून बाहेर येतायत. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी, पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये.