पुणे: माळशेज घाट परिसरातील काळू धबधब्याजवळ रविवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ट्रेकिंगसाठी आलेल्या दोन तरुणांचा पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांना पुन्हा एकदा सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मृत्यू झालेल्या ट्रेकर्सची नावे रमण अण्णापुरे आणि पवन साठे अशी आहेत. दोघेही मित्रांसह माळशेज घाटातील प्रसिद्ध काळू धबधबा परिसरात ट्रेकिंगसाठी आले होते. मात्र, गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याचा पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान झाला होता. अशा परिस्थितीत दोघेही पाण्याच्या प्रवाहात अडकले आणि काळू नदीत वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीम राबविल्यानंतर दोघांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, माळशेज घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने धबधबे आणि नद्यांमधील पाण्याची पातळी धोकादायकरीत्या वाढली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी पाण्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने अशा ठिकाणी जाणे जीवावर बेतू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने 26 जुलैपर्यंत काळू धबधबा परिसरात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. बंदी आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पावसाळ्यात निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आणि ट्रेकर्स माळशेज घाट परिसरात दाखल होत असतात. मात्र, वाढलेला पाण्याचा वेग, घसरडे दगड आणि अचानक बदलणारी परिस्थिती यामुळे अशा ठिकाणी निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करूनच पर्यटन आणि ट्रेकिंगचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.