मुंबई : एका धक्कादायक घटनेत, टेलिव्हिजन अभिनेत्री संचिता उगले हिने 14 जून रोजी राहत्या घरी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची माहिती समोर येत आहे. ती 30 वर्षांची होती. टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधील कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या संचिताने ‘कुमकुम भाग्य’, ‘साजन घर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आणि ‘छावा’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 14 जून रोजी नालासोपारा (पूर्व) येथील आचोळे गावातील ‘साई संतोषी’ इमारतीत असलेल्या तिच्या निवासस्थानी घडली. प्राथमिक माहितीनुसार, तिने सायंकाळी 7 ते 7.30 च्या दरम्यान आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच तिचे कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांनी तिला तातडीने वसई-विरार महानगरपालिका रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. संचिताचे वडील मच्छिंद्र उगाले यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, आचोळे पोलिसांनी 15 जून रोजी ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ (BNSS) च्या कलम 194 अन्वये अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व संभाव्य पैलूंची पडताळणी केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.