जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
6 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, तीन दिवसांपूर्वी सरकारचा आदेश मिळूनही मराठवाड्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची दुर्दशा सुरूच आहे. आजही मराठवाड्यातील कोणत्याही जिल्ह्यात तूर खरेदीला मुहूर्त लागला नाही.
ही खरेदी आजही पंचनामे, अहवाल आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट पाहत असल्याने खरेदी केंद्रावर तुरीची राखण करणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
बीड, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यात आज तूर खरेदी करणे शक्य होणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय तर औरंगाबाद, नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यातील अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट पाहत आहे.
उद्या आणि परवा दोन सलग सुट्ट्या आल्याने खरेदी करायची की नाही, याबाबतही कोणतीही सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळाली नाही.
आज किंवा उद्यात खरेदी सुरु झाली तर 1 मे रोजी ती बंद राहणार आहे. त्यामुळे पुढचा आठवडाही शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावरच काढावा लागणार आहे.