जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
तूर उत्पादक शेतकऱ्यांमागचं शुक्लकाष्ठ काही संपण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सुल्तानी संकटाने त्रस्त असतानाच, बाजार समितीतही त्याचा छळ सुरूच असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यात तूर खरेदीमध्ये व्यापारी संचालक गोरगरीब शेतकऱ्यांना नडत तूर खरेदीत घोटाळा करत असल्याचा आरोप नांदुरा बाजार समिती संचालक करत आहेत.
नांदुरा तालुक्याच्या तूर खरेदी केंद्रावर छुप्या मार्गाने मोजमाप सुरू असल्याचं, शेतकऱ्यांनीच उघड केलं. यावेळी पकडलेल्या हमालाने ही तूर संचालकांचीच असल्याची कबुली दिली.
केवळ एवढंच नव्हे तर नांदूरा तूर खरेदी केंद्रावर विकल्या गेलेल्या तुरीचे लाखो रुपयांचे चेक ‘एमटीएम’ या एकाच नावावर उचलले गेले. तूर केंद्राच्या सचिवांनी हे सर्व चेक विक्री संस्थेचे अध्यक्ष मुकुंद तुळशीराम मापारींकडे असल्याचं सांगितलं.
बुलडाण्याच्या नांदूरा तूर केंद्रावर सुरू असलेल्या या सर्व प्रकाराविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आवाज उठवला. तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.