Tuljabhavani Temple: तुळजाभवानी चरणी भक्ती विसरून ‘शक्ती’चा गैरवापर; राडा करणाऱ्या 10 भाविकांना दोन वर्षे प्रवेश बंदी

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात भाविकांमध्ये झालेल्या भांडणानंतर 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी चरणी भक्ती विसरून ‘शक्ती’चा गैरवापर; राडा करणाऱ्या 10 भाविकांना दोन वर्षे प्रवेश बंदी

तुळजापूर: साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानीच्या दरबारात जिथे भाविक नतमस्तक व्हायला येतात, तिथेच श्रद्धेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मंदिराच्या पवित्र्याला बाधा आणत, शिस्तीचा भंग करणाऱ्या उर्मट भाविकांना आता मंदिर प्रशासनाने आणि कायद्याने मोठा दणका दिला आहे. देवस्थानच्या कट्ट्यावर भक्तीचा जागर होण्याऐवजी तिथे पूजेच्या साहित्यावरून 'तुंबळ हाणामारी' रंगल्याने प्रशासनाने केवळ गुन्हाच दाखल केला नाही, तर या भाविकांना दोन वर्षांसाठी देवीच्या दर्शनापासून वंचित ठेवण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.

घटनेचा सविस्तर आढावा घेतल्यास, सुट्ट्यांच्या निमित्ताने 2 एप्रिल 2026 रोजी मंदिरात भाविकांची अभूतपूर्व गर्दी होती. अशातच मंदिराच्या कट्ट्यावर नारळ, फुले आणि पूजेच्या साहित्यावरून दोन गटांत किरकोळ बाचाबाची झाली. मात्र, रागावर नियंत्रण न राहिल्याने या किरकोळ वादाचे रूपांतर पाहता पाहता हाणामारीत झाले. एकमेकांवर धावून जाणे, आरडाओरडा करणे आणि भाविकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असे कृत्य या गटांनी केले. या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्याने देवीच्या भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

हेही वाचा: Pandharpur Crime : सतत मारहाण, तुच्छतेची वागणूक नवरा जबरदस्ती…, पंढरपुरात 14 वर्षाच्या नववधूने उचललं टोकाच पाऊल

या प्रकरणाची मंदिर संस्थानने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. केवळ तोंडी समज देऊन न थांबता, प्रशासनाने थेट तुळजापूर पोलिसांत धाव घेतली. विशेष म्हणजे, पोलिसांनी या गुंडागिरी करणाऱ्या भाविकांवर 'भारतीय न्याय संहिता 2023' (BNS) मधील नवीन कलमांनुसार कारवाईचा बडगा उगारला आहे. सार्वजनिक शांततेचा भंग करणे (कलम 194-2) आणि धोकादायक कृती करणे (कलम 135) यासह महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत 10 जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

या कारवाईतील सर्वात मोठा दणका म्हणजे, मंदिर संस्थानने आरोपींच्या प्रवेशावर घातलेली बंदी. मच्छिंद्र वाळज, कृष्णन तागुंदे, स्वप्निल लांडे, निल बेडभर यांच्यासह एकूण 10 जणांना पुढील दोन वर्षांसाठी मंदिर परिसरात पाऊल ठेवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. "मंदिर हे श्रद्धेचे स्थान आहे, तिथे दादागिरी खपवून घेतली जाणार नाही," असा स्पष्ट संदेश या निर्णयाद्वारे देण्यात आला आहे. प्रशासनाच्या या पावलामुळे भविष्यात गोंधळ घालणाऱ्यांना चांगलाच जरब बसणार आहे.

मंदिराच्या प्रतिमेला तडा देणाऱ्या आणि धार्मिक भावना दुखावणारे वर्तन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने यापूर्वीच दिला होता. सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे गर्दी वाढत असताना, इतर भाविकांनी देखील शिस्तीचे पालन करावे, असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे. श्रद्धेच्या ठिकाणी संयम आणि भक्ती महत्त्वाची असते, हे विसरणाऱ्यांना आता कायद्याच्या भाषेत उत्तर मिळाले आहे, हेच या कारवाईवरून स्पष्ट होते. 

हेही वाचा: RBI Payment Rules: परदेशातून पैसे पाठवताना आता होणार नाही विलंब; RBI ने आंतरराष्ट्रीय व्यवहाराचे नियम बदलले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number