Tukaram Mundhe: मोठी बातमी! धडक कारवाई करणारे तुकाराम मुंढेच अडचणीत; अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एल्गार, नेमकं प्रकरण काय?

15 जुलै रोजी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना निवेदन देत कर्मचाऱ्यांनी विविध प्रशासकीय निर्णयांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Tukaram Mundhe: मोठी बातमी! धडक कारवाई करणारे तुकाराम मुंढेच अडचणीत; अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एल्गार, नेमकं प्रकरण काय?

अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात विभागातील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रार केली आहे. 15 जुलै रोजी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना निवेदन देत कर्मचाऱ्यांनी विविध प्रशासकीय निर्णयांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

निवेदनानुसार, प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक कर्मचारी आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. विभागातील रिक्त पदांमुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत काम करावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

कर्मचाऱ्यांनी अन्न, औषध आणि सौंदर्यप्रसाधनांच्या प्रलंबित नमुन्यांचा निपटारा घाईने करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचाही आरोप केला आहे. त्यामुळे प्रयोगशाळेतील तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय औषध संहिता (IP), ब्रिटिश फार्माकोपिया (BP) आणि USP या मानकांनुसार तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. निवेदनात दोन शिफ्टचा निर्णय मागे घेणे, पूर्वीची कार्यालयीन वेळ लागू करणे, रिक्त पदे भरणे, अतिरिक्त कर्मचारी व संसाधने उपलब्ध करून देणे आणि वाढीव कामासाठी योग्य भत्ते देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एफडीएने राज्यभरात अनेक धडक कारवाया केल्या होत्या. मात्र, आता त्यांच्या कार्यपद्धतीवरच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी तुकाराम मुंढे किंवा एफडीएकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number