अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर भूमिका घेतली आहे. दोन दिवस चाललेल्या विशेष तपासणी मोहिमेनंतर पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील 10 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
एफडीएच्या पथकाने विविध बेकरी, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, डेअरी आणि कॅन्टीनची पाहणी केली असता अनेक ठिकाणी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील तरतुदींचे पालन होत नसल्याचे समोर आले. काही ठिकाणी स्वच्छतेचा अभाव, अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील त्रुटी आणि उत्पादन प्रक्रियेतील निष्काळजीपणा आढळल्याने संबंधित आस्थापनांविरोधात तातडीने प्रशासकीय कारवाई करण्यात आली.
कारवाई झालेल्या आस्थापनांमध्ये पुण्यातील कोंढवा येथील गोल्डन बेकरी, येवलेवाडीतील गोल्डन मॅजेस्टिक बेकरी, मंगळवार पेठेतील स्टार केटरिंग सर्व्हिस, सोमवार पेठेतील अशोक बार अँड रेस्टॉरंट आणि बाणेरमधील बिकांगे बिर्यानी एलएलपी यांचा समावेश आहे. याशिवाय अंबेगाव तालुक्यातील पारगाव पेठ येथील सिद्धार्थ ॲग्रो-डेअरीवरही परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.
पुण्याबरोबरच इतर जिल्ह्यांतील काही आस्थापनांनाही या कारवाईचा फटका बसला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील सह्याद्री रेस्टॉरंट अँड ढाबा आणि सिगडी रेस्टॉरंट, कोल्हापूरच्या करवीरमधील व्हीबीजीओआर शाळा कॅन्टीन तसेच सांगलीतील हलद भवन कॅन्टीन यांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत. अन्न उत्पादन आणि विक्री करणाऱ्या प्रत्येक आस्थापनाने स्वच्छता, सुरक्षितता आणि अन्न गुणवत्ता यासंबंधीचे नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा एफडीएने दिला आहे. राज्यभर अशाच प्रकारच्या तपासण्या सातत्याने सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.