FDA च्या धडक कारवायांमुळे हॉटेल्सधारक, खाद्यपदार्थांनी दुकानं, दूध डेअरी संचालकांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. FDA कडून गेल्या काही दिवसांत भेसळयुक्त अन्नपदार्थांचे अनेक रॅकेट्स उध्वस्त करण्यात आलेत. अशातच मुंबईतील अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईत चहासाठी वापरल्या जाणाऱ्या दुधामध्ये भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनासोबत मिळून मुंबई पोलीस गुन्हे शाखा युनिट-11 ने गोरेगाव परिसरात संयुक्त कारवाई करत भेसळयुक्त दुधाच्या एका मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत 'अमुल' आणि 'गोकुळ' या नामांकित ब्रँडेड दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
'अमुल' आणि 'गोकुळ' या नामांकित ब्रँडच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये अशुद्ध पाणी मिसळून दुधात भेसळ करण्याचे काम सुरू असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. 'अमुल' आणि 'गोकुळ' या नामांकित कंपन्यांचे दुध बाजारात मोठ्या प्रमाणावर विकले जाते. मात्र ग्राहकांना अशुद्ध पाणी मिश्रित भेसळयुक्त दूध दिले जात होते. याचपार्श्वभूमिवर कृष्णा वेंकय्या लिंगम पल्ली आणि रवी कनह्या पटिपाका या दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
यावेळी हे भेसळयुक्त दूध ते गोरेगाव परिसरातील स्थानिक निवासी भाग तसेच चहाच्या टपऱ्यांवर पुरवत असल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी दिली. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण झाला होता.
यावेळी कारवाई दरम्यान घटनास्थळावरून तब्बल 558 लिटर भेसळयुक्त दूध , 224 नग बनावट दुधाच्या पिशव्या, मोबाईल फोन आणि दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्याचा मोठा साठा जप्त केला असून सर्व मुद्देमालाची किंमत 50 हजार 304 रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे गोरेगाव परिसरातील एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.