अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात विविध ठिकाणी धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित उत्पादनांची गुणवत्ता तपासण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.या मोहिमेदरम्यान अन्नपदार्थ तयार करणारे आणि विक्री करणारे विविध व्यावसायिक आस्थापना, गोदामे तसेच वितरण केंद्रांची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे उल्लंघन आढळलेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी नमुने जप्त करून पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले.
पुण्यातील ज्या 7 रेस्टॉरंट्सवर एफडीएने धाडी टाकल्या, तिथे अन्न सुरक्षा कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले. तपासणी दरम्यान हॉटेलच्या स्वयंपाकघरात कमालीची अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आला.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून आवश्यकतेनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे सांगत अन्न व्यवसायिकांनी स्वच्छता, गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले.
दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यात अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी निकृष्ट किंवा संशयास्पद अन्नपदार्थांबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.