पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा संघर्ष समाप्ती योजनेचे स्वागत केले आहे. मोदी म्हणाले की ही योजना इस्रायल आणि पॅलेस्टाईनसाठी दीर्घकालीन आणि शाश्वत शांततेचा मार्ग दाखवणारी आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिताना मोदींनी नमूद केले की, “अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेली गाझा संघर्ष समाप्ती योजना एक व्यापक आराखडा आहे. ही योजना इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकांसह संपूर्ण पश्चिम आशियासाठी दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि विकास सुनिश्चित करणारी आहे.” त्यांनी अशीही अपेक्षा व्यक्त केली की या पुढाकाराला सर्व संबंधित देशांनी पाठिंबा द्यावा, जेणेकरून संघर्ष समाप्त करून स्थैर्य निर्माण करता येईल.
ट्रम्प यांनी ही योजना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये जाहीर केली. या प्रस्तावाला इस्रायलने मान्यता दिली आहे. भारतासह कॅनडा, कतार, जॉर्डन, यूएई, इंडोनेशिया, पाकिस्तान, तुर्की, सौदी अरेबिया आणि इजिप्तसह अनेक देशांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
एका अहवालानुसार, ट्रम्प यांच्या योजनेत गाझामध्ये तात्काळ शस्त्रसंधी करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच या भागाला “दहशतवादमुक्त आणि शेजाऱ्यांना धोका न देणारे क्षेत्र” म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. गाझाच्या पुनर्विकासासाठी व्यापक पावले उचलण्याचेही आश्वासन या आराखड्यात देण्यात आले आहे.
योजनेंतर्गत इस्रायली सैन्याने गाझातून माघार घ्यावी आणि हमासने बंदिवान इस्रायली नागरिकांना मुक्त करावे, असे नमूद केले आहे. युद्धानंतर गाझाचे प्रशासन एका तात्पुरत्या तांत्रिक आणि राजकारणमुक्त पॅलेस्टिनी समितीकडे सोपवले जाईल. ही समिती स्थानिक नागरिकांसाठी आवश्यक सेवा आणि नगरपालिकेचे दैनंदिन कामकाज बघेल.
याशिवाय, हमास किंवा त्याचे कोणतेही गट गाझाच्या प्रशासनात थेट, अप्रत्यक्ष किंवा अन्य कुठल्याही स्वरूपात सहभागी होणार नाहीत, असेही या योजनेत स्पष्ट करण्यात आले आहे.