वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. हा युद्धविराम संपण्याच्या अवघ्या एक दिवस आधीच हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुन्हा संघर्ष भडकण्याची भीती काही प्रमाणात कमी झाली आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या विनंतीनंतर अमेरिकेने इराणविरोधातील संभाव्य हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. इराणकडून एकत्रित प्रस्ताव येईपर्यंत आणि चर्चा पूर्ण होईपर्यंत युद्धविराम कायम ठेवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र अमेरिकेची नौदल नाकेबंदी कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
इराणकडून अद्याप या निर्णयावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. काही इराणी नेत्यांनी युद्धविराम वाढवण्याला वेळकाढूपणा आणि संभाव्य हल्ल्याची तयारी असे संबोधले आहे. इराणने अमेरिकेची बंदरांवरील नाकेबंदी ही युद्धविरामाचे उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी युद्ध थांबवण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्याचे म्हटले आहे. चर्चेला सातत्य मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. त्यांनी दोन्ही देश लवकरच व्यापक शांतता करार करतील, अशी आशा व्यक्त केली आहे. पाकिस्ताननेच युद्धविराम वाढवण्याची मागणी केली होती, कारण दुसऱ्या टप्प्यातील चर्चेबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.
या निर्णयाचा परिणाम जागतिक बाजारावरही दिसून आला. युद्धविराम वाढवल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात तेजी दिसली, तर तेलाच्या किमती मात्र 100 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास कायम राहिल्या. होर्मुझ सामुद्रधुनी अद्याप पूर्णपणे खुली नसल्याने बाजारात अनिश्चितता कायम आहे.