Akola Viral Video: पाठीवर आजारी पती, हातात लेकरू अन् मदतीसाठी भटकंती; सरकारी रुग्णालयातील व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर

अकोल्यातील सरकारी रुग्णालयातील एका व्हायरल व्हिडीओने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Akola Viral Video: पाठीवर आजारी पती, हातात लेकरू अन् मदतीसाठी भटकंती; सरकारी रुग्णालयातील व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर

अकोला: अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एक हृदयद्रावक घटना सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या व्हिडीओमध्ये एक आदिवासी महिला आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन रुग्णालय परिसरात मदतीसाठी फिरताना दिसत आहे. तिच्या एका हातात लहान मूल असून दुसऱ्या बाजूला आवश्यक सामानाची बॅग बांधलेली असल्याचे दृश्य अनेकांच्या मनाला चटका लावणारे ठरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा पती गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याला मेंदूविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी तातडीने रुग्णालयात आणण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर तिला आवश्यक वैद्यकीय सुविधा वेळेत मिळाल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुग्णाला डॉक्टरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर उपलब्ध झाले नाही, असा दावा महिलेने केला आहे.

हेही वाचा: Anita Bishnoi: ‘कपडे हुए छोटे…’ ऑनलाईन ट्रोलिंगला कंटाळून अनिताने उचलले टोकाचे पाऊल; इंस्टाग्राम लाईव्हवरच केले विष प्राशन

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन या महिलेने कोणाची वाट न पाहता स्वतःच पुढाकार घेतला. आपल्या पतीला पाठीवर उचलून तिने उपचार विभागाचा शोध सुरू केला. त्याचवेळी हातात लहान मुलाला सांभाळत आणि आवश्यक साहित्य घेऊन ती रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये मदतीसाठी फिरत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते.

या संपूर्ण प्रकारात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे परिसरात कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक उपस्थित असल्याचे दिसत असतानाही मदतीसाठी कोणी पुढे आल्याचे व्हिडीओत दिसत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी सरकारी रुग्णालयांतील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जबाबदार अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गंभीर रुग्णांसाठी मूलभूत सुविधा त्वरित उपलब्ध होणे अपेक्षित असताना अशा घटना घडत असल्यास आरोग्य यंत्रणेची कार्यपद्धती तपासण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिक सरकारी रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. अशा परिस्थितीत त्यांना वेळेवर मदत न मिळाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

हेही वाचा: Anand Mahindra : रस्त्यावरील चिमुकल्या जादूगाराची कमाल पाहून आनंद महिंद्रा थक्क; शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी, पाहा Video

दरम्यान, या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. संबंधित घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.

एका बाजूला रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी पत्नीची सुरू असलेली धडपड आणि दुसऱ्या बाजूला मदतीचा अभाव, या दोन्ही गोष्टींमुळे हा व्हिडीओ केवळ एक घटना न राहता संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number