बारामती: बारामती तालुक्यातील गोजूबावी गावाच्या हद्दीत पुन्हा एकदा विमान कोसळल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रेडबर्ड प्रशिक्षण संस्थेचे एक शिकाऊ विमान शेतातील खांबाला धडकून थेट जमिनीवर कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शेतात काम करणारी एक महिला थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बारामती परिसरात नियमित प्रशिक्षण उड्डाण सुरू असताना हे विमान अचानक नियंत्रणाबाहेर गेले. त्यानंतर विमानाने शेतातील विद्युत खांबाला धडक दिली आणि काही अंतरावर कोसळले. अपघाताच्या वेळी शेतात काही महिला काम करत होत्या. त्यापैकी एक महिला अवघ्या शंभर फूट अंतरावर असल्याने काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या अपघातात शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वैमानिकाला बाहेर काढण्यास मदत केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, हे विमान नेमकं तांत्रिक बिघाडामुळे कोसळलं की अन्य कोणते कारण होते, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे. विमान प्रशिक्षण संस्थेकडूनही या घटनेबाबत अंतर्गत चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, याच गोजूबावी परिसरात यापूर्वीही विमान अपघाताच्या घटना घडल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाशी संबंधित अपघाताची घटनाही याच भागात घडल्याची आठवण स्थानिकांनी व्यक्त केली. त्यामुळे या परिसरातील उड्डाण सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गोजूबावी परिसरातील एमआयडीसीजवळ घडलेल्या या घटनेमुळे काही काळ नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. सध्या पोलिसांकडून पंचनामा आणि पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे.