Maratha Protester Death: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवली सराटी येथे पुकारलेल्या निर्णायक आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बीडवरून निघालेल्या एका निष्ठावंत आंदोलकाचा वाटेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सुग्रीव बापू शिंदे (रा. नांदुर घाट, ता. केज, जि. बीड) असे मृत पावलेल्या मराठा समर्थकाचे नाव आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सुग्रीव शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत वाहनाने अंतरवलीकडे प्रवास करत होते. मात्र, गेवराई शहराच्या जवळ पोहोचताच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या बातमीमुळे सकल मराठा समाजात आणि बीड जिल्ह्यात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजुरी आणि धाराशिवमधून ताफ्यांची कूच; ट्रॅक्टर अन् रिक्षा घेऊन मराठा बांधव अंतरवलीकडे रवाना
दुसरीकडे, घटनेचे सावट असूनही मराठा समाज जरांगे यांच्या हाकेला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने आंदोलनाकडे कूच करत आहे. बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी येथून जेवणाचे साहित्य आणि आवश्यक रसद सोबत घेऊन आंदोलकांचे मोठे ताफे अंतरवली सराटीच्या दिशेने रवाना झाले आहेत. गरज पडल्यास येथून थेट मुंबईच्या दिशेनेही कूच करण्याची आपली तयारी असल्याचे या समर्थकांनी सांगितले. तसेच, धाराशिव जिल्ह्यातूनही मराठा बांधव स्वतःच्या रिक्षा आणि ट्रॅक्टर घेऊन मोठ्या संख्येने जालन्याकडे निघाले आहेत. "मागण्या मान्य होईपर्यंत आणि आरक्षण मिळेपर्यंत अंतरवली सोडणार नाही," असा ठाम निर्धार या आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलनाची झळ; सिल्लोडच्या केऱ्हाळा फाट्यावर बेमुदत रास्ता रोको
अंतरवली सराटीतील आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटू लागले असून छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलकांनी रस्ते रोखून धरले आहेत. सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा फाटा येथे मराठा समर्थकांनी छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर ठिय्य मांडून बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. महामार्गावर फलक लावून वाहने अडवण्यात आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. जरांगे यांच्या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी जोरदार मागणी आंदोलक करत आहेत.