नाशिक: महाराष्ट्रातील अपघात सत्र काही थांबेना. ताम्हिणी घाटतील दुर्घटनेनंतर आता नाशिक जिल्ह्यातील अपघाताची घटना समोर आली आहे. मोखाडा – त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तोरंगण घाटात गुरुवारी रात्री एक आयशर ट्रक खोल दरीकाठावर आदळला आणि काही क्षणांतच परिसरात भीषण आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. नेमकं काय झालं आहे हे समजून घेईपर्यंत एका तरुणाचा मृत्यू झाला आणि 30 पेक्षा जास्त मजूर रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसले.
या अपघातात सुभाष दिवे (वय 28, रा. हाडे, जव्हार) यांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. रोजगाराच्या शोधात कमी पैशात प्रवास करण्यासाठी हे सर्वजण आयशर ट्रकने नाशिकवरून मोखाड्याकडे निघाले होते. मात्र तोरंगण घाटाजवळ अचानक ट्रकचा ताबा सुटला, ब्रेकने साथ सोडली आणि काही सेकंदांत संपूर्ण वाहन उलथून पडले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघात रात्री आठच्या सुमारास घडला. अंधारात दरीकाठावर उलटलेले वाहन, रस्त्यात पडलेले सामान, रक्ताने माखलेले प्रवासी ही भीषण स्थिती पाहून स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. रुग्णवाहिकांनी धाव घेत जखमींना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात आणले. जखमींची संख्या वाढू लागल्याने रुग्णालयात अक्षरशः एकाच वेळी गर्दी उसळली. जखमी प्रवाशांपैकी काहींची अवस्था अत्यंत गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काहींना मोठ्या प्रमाणावर मुका मार लागला असून त्यांची देखील तपासणी सुरू आहे.
अद्याप सर्व मजुरांची नावे समोर आलेली नसली तरी बचावपथक आणि रुग्णालयातील कर्मचारी रात्रभर मदतकार्य करत आहेत. या भीषण अपघाताने मोखाडा परिसर हादरून गेला आहे. ट्रकचे ब्रेक अचानक का निकामी झाले? वाहनामध्ये किती प्रवासी होते? या प्रश्नांची उत्तरे तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.