दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. तसेच निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यामुळे बाजारांत वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. अशातच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना रेल्वे प्रशासनाने दिली आहे. उद्या मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. माटुंगा-मुलुंड धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
हार्बर रेल्वेमार्गावर सकाळी ९.५३ ते सायंकाळी ४.५८ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मात्र रेल्वे मेगाब्लॉक असणाऱ्या कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेमार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच रेल्वेच्या मेगाब्लॉक कालावधीत प्रवाशांसाठी पनवेल आणि कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून विशेष लोकल सेवेची सोय करण्यात आली आहे.