जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर…येत्या काही दिवसांतच मोबाइलवरून टोल भरण्याची सुविधा प्राप्त होणार आहे. यापुढे प्रवाशांना टोल भरण्यासाठी रखडण्याची आवश्यकता भासणार नाही. राष्ट्रीय महामार्गांवरील टोल भरण्यासाठी लवकरच न थांबता टोल भरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. मोबाइलला प्रीपेड वॉलेट, क्रेडिट कार्ड किंवा बँकेचे खाते जोडल्यास ही सुविधा मिळू शकेल. त्यामुळे टोलनाक्यावरून वाहन जाताच संबंधितांच्या खात्यातून टोलची रक्कम आपोआप वजा होईल.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे ही योजना राबवण्यात येणार असुन यासाठी पाच महामार्गांची निवड करण्यात आली आहे. दिल्ली ते मुंबई, दिल्ली ते चंडीगड, दिल्ली ते कोलकाता आणि बेंगळुरू ते चेन्नई या पाच महामार्गांवर ही योजना राबवण्यात येणार आहे.
प्रवाशांनी मोबाइल अॅप डाउनलोड केल्यानंतर त्यावर वाहनाची सर्व माहिती द्यावी लागणार आहे. प्रवाशांनी दिलेल्या माहितीची पडताळणी ‘नॅशनल व्हेइकल डेटाबेस’च्या आधारे करण्यात येणार आहे. त्या आधारे वाहनाचे मालक आणि नोंदणीची सत्यता तपासण्यात येणार आहे. प्रवास सुरू करण्यापूर्वी रस्त्यावर लागणाऱ्या सर्व टोलनाक्यांवरील टोलची रक्कम आधीच भरण्याचा पर्यायही उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रीपेड वॉलेटची मदत घेतली जाऊ शकते. संबंधित वाहन टोलनाक्यावर पोहोचण्यापूर्वी संबंधित प्रणाली ‘क्यूआर कोड’ची निर्मिती करील. हा कोड चालकाला टोलनाक्यावर स्कॅन करावा लागणार आहे, अशी माहिती ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
‘एनएचएआय’च्या मोबाइल अॅपला कोणत्याही ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ अर्थात ‘यूपीआय’शी जोडून त्या माध्यमातून संबंधित प्रवासी थेट आपल्या बँक खात्यातून टोलची रक्कम भरू शकणार आहे. अशा पद्धतीच्या पेमेंटसाठी दोन पद्धतींची चाचणी घेण्यात येत आहे. ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन टोलनाक्यावर पोहोचल्यानंतर संबंधित यंत्रणा वाहनाची ओळख पटवेल. त्यानंतर वाहनाची श्रेणी समजून घेऊन प्रावाशाच्या खात्यातून रक्कम कापून घेण्यात येईल.