शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर अनेकदा तेजस ठाकरेंच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा झाली आहे. आता पुन्हा एकदा तेजस ठाकरे चर्चेत आले असून आता तर त्यांचे बॅनर्सही लागले आहेत. मुंबईतल्या गिरगावमध्ये शिवसैनिकांनी पोस्टर्स लावले आहेत. तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आहे. आजची शांतता उद्याचे वादळ…नाव लक्षात ठेवा, तेजस उद्धव साहेब ठाकरे, असं या बॅनरवर लिहिलं आहे. त्यामुळे आता तेजस ठाकरेंच्या राजकारणातल्या सक्रियतेचं दर्शन यातून घडतं आहे.
बंडानंतर पहिल्यांदाच झालेल्या आणि शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्यातही शिवसैनिकांना तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाची उत्सुकता होती. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी तशी घोषणा केली नाही. त्यानंतर अनेकदा तेजस ठाकरे राजकारणात येणार अशा चर्चा रंगत होत्या. सेनेच्या बॅनरवर आदित्य, उद्धव यांच्यासोबत तेजस यांचाही फोटो असणं हेही सूचक होतं. आता लावलेल्य बॅनर्समधून मात्र सगळं स्पष्ट होत आहे.
उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे राजकारणात सक्रीय आहेत त्यात आता ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना तेजस ठाकरेंच्या राजकारणातील एन्ट्रीची प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे तेजस ठाकरे हे शिवसेनेतील नवं नेतृत्व असल्याचं बोललं जात आहे. गिरगावातील शाखाप्रमुख बाळा आहिरकर यांनी तेजस ठाकरेंचे बॅनर लावले आहेत. आहिरकर म्हणाले की, तेजस ठाकरेंबद्दल एक आकर्षण आहे. बाळासाहेबांनी एका भाषणात तेजसचा उल्लेख करताना तो माझ्यासारखा आहे असं म्हटलं होते. तेजस ठाकरे हे वादळच असणार आहे. सध्या वादळापूर्वीची शांतता आहे. त्यामुळे तेजस ठाकरे लवकरच राजकारणात यावेत असं तरुणांना वाटतं. तेजस ठाकरेंमध्ये आम्हाला बाळासाहेबांची छबी दिसते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.