What is Time Restricted Eating: वजन कमी करण्यासाठी ‘टाइम-रिस्ट्रिक्टेड ईटिंग’ का ठरत आहे लोकप्रिय? जाणून घ्या काय आहे ही पद्धत आणि तिचे फायदे

या पद्धतीत दिवसातील ठरावीक वेळेतच अन्न सेवन केले जाते आणि उर्वरित काळ उपवास ठेवला जातो. योग्य पद्धतीने अवलंबल्यास वजन नियंत्रण आणि मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी मदत होऊ शकते.

What is Time Restricted Eating: वजन कमी करण्यासाठी ‘टाइम-रिस्ट्रिक्टेड ईटिंग’ का ठरत आहे लोकप्रिय? जाणून घ्या काय आहे ही पद्धत आणि तिचे फायदे

आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत वाढते वजन ही अनेकांसाठी गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. कामाचा ताण, अनियमित आहार आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अनेकजण व्यायाम, औषधे तसेच विविध प्रकारच्या आहार पद्धतींचा अवलंब करताना दिसतात. अलीकडच्या काळात इंटरमिटंट फास्टिंग सोबतच टाइम-रिस्ट्रिक्टेड ईटिंग (Time-Restricted Eating, TRE) ही पद्धतही विशेष चर्चेत आली आहे. तज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार अवलंबल्यास ही पद्धत वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकते.

टाइम-रिस्ट्रिक्टेड ईटिंग म्हणजे दिवसभर कधीही खाण्याऐवजी ठरावीक कालावधीतच अन्न सेवन करणे. साधारणपणे या पद्धतीत आठ ते 10 तासांच्या कालावधीत जेवण केले जाते, तर उर्वरित वेळ उपवास ठेवला जातो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत अन्न घेत असेल आणि त्यानंतर पुढील 16 तास काहीही खात नसेल, तर त्या पद्धतीला टाइम-रिस्ट्रिक्टेड ईटिंग असे म्हटले जाते. या कालावधीत अन्न घेणे टाळले जाते, मात्र पाणी, नारळपाणी किंवा ग्रीन टी घेण्यास परवानगी असते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीर उपवासाच्या स्थितीत असताना मेटाबॉलिझम प्रक्रियेला विश्रांती मिळते. त्यामुळे शरीर साठवलेली चरबी ऊर्जा म्हणून वापरू लागते. परिणामी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच पचनसंस्थेला सुमारे 16 तासांचा आराम मिळाल्याने शरीराची नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रिया अधिक सक्रिय होते.

हेही वाचा: NCERT Textbook Controversy: NCERT पुस्तक वादात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; केंद्र सरकारला दिले 'हे' महत्त्वपूर्ण आदेश

या आहार पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वजन नियंत्रण. ठरावीक वेळेत अन्न घेतल्यामुळे शरीरात जाणाऱ्या कॅलरींचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. काही संशोधनांनुसार ही पद्धत टाइप-2 डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासही सहाय्यक ठरू शकते. याशिवाय हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि पचनाशी संबंधित काही समस्या कमी करण्यासाठीही ही पद्धत उपयुक्त ठरू शकते.

तथापि, ही पद्धत सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही. गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, व्यावसायिक खेळाडू किंवा ज्यांना गंभीर आजार आहेत अशांनी ही आहार पद्धती सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने उपवास केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की वजन कमी करण्यासाठी कोणतीही डाएट पद्धती स्वीकारण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि संतुलित जीवनशैली यांच्या मदतीनेच आरोग्यदायी पद्धतीने वजन नियंत्रणात ठेवणे शक्य होते.

आरोग्य सूचना (Health Disclaimer): ही माहिती केवळ सामान्य जनजागृती आणि माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. याचा वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावू नये. कोणतीही आहार पद्धती, उपचार किंवा जीवनशैलीतील बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा पात्र आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल जबाबदार राहणार नाही.

हेही वाचा: How To Check QR Code: क्यूआर कोड स्कॅन करताना खरा आहे की खोटा हे कसं ओळखायचं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number