जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
वाघांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर वाघांना वाचवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येतात. दूरचित्रवाणीवरील जाहिरातींपासून ते वनपर्यटन क्षेत्रांवरील जनजागृतीपर्यंत कित्येक उपाययोजना राबविण्यात आल्या. वनखात्याने कोटय़ावधी रुपये व्याघ्रकेंद्रित पर्यटनावर कमावले आहेत. देशाने गेल्या 48 तासांत 7 वाघ गमावले आहेत. निधी असूनही निष्काळजीपणामुळे वाघांच्या मृत्यूंना वनविभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचं स्पष्ट झालयं.
पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या कोलितमाराजवळ पेंच नदीत 24 फेब्रुवारीला एक वाघ मृतावस्थेत आढळला. वाघाच्या मृत्यूनंतर मात्र तीन दिवसांनी प्रशासनाच्या हे लक्षात आले. मृत वाघाच्या पायाला जखम असल्याने मगरीच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. तोच रविवारी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली वन बीटमध्ये 25 फेब्रुवारीला एका वाघाचा उपचाराअभावी मृत्यू झाला.
गोरेवाड्यातील वन्यप्राणी बचाव केंद्रात एका वाघिणीने तीन-चार पिल्ले गमावली. प्राणीसंग्रहालयातील वाघिणीचे पिल्ले सांभाळ करण्याची पद्धत वेगळी असते, मात्र गोरेवाडा प्रशासनाच्या निष्काळजीपणाने 24 तासांत वाघिणीच्या सुदृढ पिलांचा जीव गेला. वाघीण पिल्लांना जन्म देणार आहे हे ठाऊक असून सुद्धा तज्ज्ञांची मदत घेण्याची तत्परता प्रशासनाने दाखवली नाही. ब्रम्हपुरी वनविभागाच्या तळोधी वनपरिक्षेत्रातील गंगासागर हेटी बिटात, 26 फेब्रुवारीला दोन महिन्यांच्या वाघाच्या बछडय़ाचा रविवारी चंद्रपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात मृत्यू झाला. आईपासून या बछडय़ाला नागपूर येथे उपचारासाठी आणण्यात येणार होते, पण या ठिकाणीसुद्धा निर्णय घेण्यास वनखात्याने उशिर लावला आणि बछडय़ाचा मृत्यू झाला.