गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सून पावसाने अखेर सक्रिय होत राज्यात जोरदार हजेरी लावली. कालपासून अनेक भागांत कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून वाढत्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळू मुंबई, ठाणे. रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, भंडारा, गोदिंया, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, नागपूर या भागात आज वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला.
मुंबई करांची प्रतिक्षा संपली असून मुंबईत पहाटेपासून ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरात पाऊसाची जोरदार बॅटिंग केली आहे. सकाळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे कामाला जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. कोकणात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये देखील जोरदार पाऊस पडला आहे. सकाळपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणानंतर महाडमध्ये जोरदार पाऊस कोसळला आहे.
पुण्यात सुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण असून वाढलेल्या हवेतील आर्द्रतेमुळे पुणेकर उकाड्याने हैराण झाले होते. आज पुण्यात विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून उकाड्यामुळे आतुरतेने पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना अखेर काहीसा दिलासा मिळाला आहे. पुण्यात हवामान विभागाने पुढील काही तासांतही ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्ह्याची अखेर पावसाने हजेरी लावली असून पहाटेपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या आगमनाने शेतशिवारांसह शहरातील वातावरणही आल्हाददायक झाले आहे.
मान्सूनपूर्व पावसाऐवजी नागपूरसह विदर्भात प्रखर उन्हाचा तडाखा कायम असून नागपूरचे कमाल तापमान 40.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तापमानात 1.8 अंशांची घट झाली असली तरी ते सरासरीपेक्षा तब्बल 6 अंशांनी अधिक राहिल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात 25 जूनपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले असून ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड परिसरात चक्राकार वारे किंवा द्रोणीय स्थिती नसल्याने ढगांची निर्मिती होत नसून वातावरण कोरडे राहिले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 जूनपासून मान्सून रेषेत हालचाल होण्याची शक्यता आहे, तर जूनच्या अखेरच्या आठवड्यात विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपुरात किमान तापमान 29.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून रात्रीही उकाड्याची तीव्रता कायम आहे.
दमदार पावसामुळे परिसरातील रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी पावसाचे स्वागत केले. पावसामुळे वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली असून शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण आहे. पावसाच्या आगमनामुळे खरीप हंगामातील शेतीकामांना आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून आगामी काळात आणखी चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.