पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचे आज विधानसभेत पडसाद उमटले. या प्रकरणात कर्नाटक सरकारकडून सहकार्य मिळत नसेल तर मी स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करेल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली.
शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी आदित्य ठाकरे यांच्या धमकी प्रकरणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ८ डिसेंबर रोजी जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा आरोपी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा फॅन असून आदित्य ठाकरे सुशांत राजपूतच्या मृत्यूला जबाबदार ठरवत जीवे मारण्याची धमकी देणारा मॅसेज पाठवला. तसेच या आरोपीने आदित्य ठाकरे यांना तीन वेळा फोन केला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला बंगळुरातून अटक केली.