आषाढीचा सोहळा पंढरपुरात आल्यावर वारकरी भक्तांना राहण्यासाठी प्रशासनाने ६५ एकरवर राहण्याची सोय केली. त्याच धर्तीवर यंदा कोल्हापूर रस्ता आणि टेंभुर्णी रस्त्यावर नव्याने दोन तळ हे वारकरी भक्तांसाठी विकसित करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील गर्दीचे विकेंद्रीकरण होण्यास मदत होणार आहे.
पंढरपूर शहरात मठ – धर्मशाळा, ६५ एकर, वाळवंट परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविक वास्तव्यास असतात. त्यामुळे पंढरीत भाविकांची गर्दी होते. ह्याच गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी आता ६५ एकर प्रमाणे प्रथमच नव्याने दोन वारकरी तळांची निर्मिती करण्यात आली आहे. विठ्ठल कारखाना आणि बिडारी बंगला परिसरात हे नवीन तळ असणार आहेत. याठिकाणी वारकरी भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था, बसस्थानक , आपत्कालीन मदत केंद्र, आरोग्य केंद्र आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या वारकरी तळांमुळे कर्नाटक, कोल्हापूर, कोकण या परिसरातील भक्तांची बिडारी बंगला भागात सोय होईल. तर मराठवाडा, विदर्भ भागातील नागरिकांची विठ्ठल कारखान्यावर व्यवस्था होऊ शकते. यामुळे पंढरपूर शहरातील गर्दी विखुरली जाऊन गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनास यश येऊ शकते. शिवाय वारकरी भक्तानही चांगल्या सुविधा मिळू शकतात.