जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई, कोकणसह महाराष्ट्रचेही वातावरण बदललेले पाहायला मिळाले. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. तर, धुक्याचे प्रमाण हे असेच राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्य़ात आले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी तापमान घसरुन सरासरी 20 अंशावर आले होते. त्यामुळे दिवसाही गारवा जाणवत होता.
तसेच, उत्तर-पूर्वेकडून थंड हवा आणि पश्चिमेकडून येणारी उबदार हवेमुळे सध्या मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर धुक्याचे साम्राज्य पसरत आहे. धुक्याची ही परिस्थिती अशीच दोन दिवस राहणार असल्याचे देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. या धुक्याचा त्रास मुंबईच्या लाईफलाईनला सहन करावा लागतोय. मुंबईत सलग तिस-या दिवशी धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत आहे. धूरक्याने मुंबईकरांच्या अगदी नाकी नऊ आणले आहेत.