Nagpur Tragedy: उन्हाळ्याची सुट्टी साजरी करायला गेले, पण नदीच्या पात्रात मृत्यूनं गाठलं; कन्हान नदीत बुडून तिघांचा मृत्यू

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पिकनिकला गेलेल्या एका गटावर काळाने घाला घालत कन्हान नदीत बुडून 6 वर्षीय बालकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Nagpur Tragedy: उन्हाळ्याची सुट्टी साजरी करायला गेले, पण नदीच्या पात्रात मृत्यूनं गाठलं; कन्हान नदीत बुडून तिघांचा मृत्यू

Nagpur Tragedy: नागपूरजवळील कामठी कँटोन्मेंट परिसरातील प्रसिद्ध महादेव घाट येथे एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पिकनिकला गेलेल्या एका गटावर काळाने घाला घालत कन्हान नदीत बुडून 6 वर्षीय बालकासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

उकाड्यापासून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न ठरला जीवघेणा

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर आणि कामठी परिसरातील सुमारे 12 ते 13 जणांचा एक गट महादेव घाट येथे पिकनिकसाठी आला होता. राज्यात सध्या तीव्र उष्णता आणि उकाडा असल्याने काही जण नदीच्या थंड पाण्यात उतरले. मात्र, कन्हान नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तिघेही अचानक खोल पाण्यात अडकले. क्षणात परिस्थिती गंभीर बनली आणि तिघेही पाण्यात बुडू लागले. हा प्रकार लक्षात येताच इतर सहकाऱ्यांनी आरडाओरडा करत स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा वेग अधिक असल्याने सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

मृतांमध्ये 6 वर्षीय बालकाचा समावेश

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे रोहित नागदेवे (वय 33 वर्षे), गौतम अंबादे (वय 31 वर्षे) आणि चैतन्य अंबादे (वय 6 वर्षे) अशी आहेत. एका निष्पाप बालकासह तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहीम राबवून तिघांचेही मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा – Monsoon Delay In Maharashtra: शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका! मान्सूनचा वेग मंदावला, 15 जूननंतरच राज्यात दमदार पावसाची शक्यता

आनंदाच्या सहलीचा शोकांतिकेत अंत

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी निघालेल्या या सहलीचा शेवट मात्र अत्यंत वेदनादायी ठरला. एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागल्याने महादेव घाट परिसरासह नागपूर आणि कामठी भागात शोक व्यक्त केला जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number