वृत्तसंस्था, तैवान
तैवानच्या ईशान्य किनाऱ्याजवळ मंगळवारी रात्री तीव्र भूकंप झाला. या भूकंपात 2 ठार तर 250 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर इतकी होती. भूकंपाचे केंद्र हुआलिन या बंदरापासून 21 किलोमीटर अंतरावर होते. स्थानिक वेळेनुसार रात्री 11.50 ला भूकंपाचा तीव्र धक्का बसला. परिसरातील नागरिकांनी भीतीने रस्त्यांवर धाव घेतली. काही ठिकाणी इमारती कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला. तसेच, अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
भूकंपाच्या धक्क्यांनी हुआलिन शहरातील मार्शल या फोर स्टार हॉटेलची इमारत खचली असून त्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झालेली आहे. मदतीसाठी लष्करी फौज घटनास्थळी दाखल झाली. या भूकंपामुळे महामार्ग आणि पुलांचं नुकसान झाल्याने रस्ते तसेच रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यापैकी 28 लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आले आहे. तर स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात 250 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. भूकंपाची तीव्रता आणि इमारतींचं झालेलं नुकसान पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्याता वर्तवली जात आहे. यात 140 हून अधिक जण बेपत्ता झाले असल्याची माहिती काही वृत्तपत्रांनी दिली आहे. गेल्यावर्षी 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने तैवानमध्ये 116 जणांचा मृत्यू झाला होता.