भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या विरोधात काही खेळाडू जंतर-मंतरवर आंदोलनाला बसले आहेत. गेल्या १२ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. धरणं आंदोलनात बुधवारी रात्री ११च्या सुमारास कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यात वाद आणि हाणामारी झाली. यावेळी पोलिसांनी धक्काबुक्की केली असल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे.
स्टार खेळाडू बजरंग पुनिया आणि पोलीस यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओही समोर आला आहे. तसेच, कुस्तीपटू विनेश फोगट एका व्हिडीओमध्ये रडताना दिसत आहे. कुस्तीपटू विनेश फोगट हिनं घडल्या प्रकारासंदर्भात अनेक गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
याप्रकरणी कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये पुनियाने चार मागण्या केल्या आहेत. कुस्तीपटूंवर हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करून वॉटरप्रूफ तंबू लावण्याची परवानगी पत्राद्वारे पुनिया यांनी केली आहे.
कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे:
कुस्तीपटूंवर हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी.
वॉटरप्रूफ तंबू लावण्याची परवानगी द्यावी.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सहकाऱ्यांची सुटका करावी.
बृजभूषण सिंग यांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी.
तसेच, कुस्तीपटू विनेश फोगाट यांनीही जंतरमंतरवर कुस्तीवटूंना मारहाण केल्याचा निषेध व्यक्त केला आहे. विनेश फोगाटनं दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहून याप्रकरणी तक्रार केली आहे. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर पोलिसांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप फोगटाने पत्रात केला आहे.