मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: बहुसंख्य आमदार हे आमच्याबरोबर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आहेत. देशपातळीवर नरेंद्र मोदींचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला पाठिंबा देत आहोत. आम्ही ही भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आम्हीच आहोत. प्रांताध्यक्ष या नात्याने सुनील तटकरेंची नेमणूक केलेली आहे. आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचंच करतो आहोत. असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. तसंच पत्रकार परिषदेत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
काहींनी आमच्या विरोधात सांगून नोटीस वगैरे काढली आहे तो अधिकार कुणालाही नाही. पक्ष आणि चिन्ह आमच्याच बरोबर आहे. या गोष्टी करत असताना आमच्याबरोबरच्या आमदारांचे चं भवितव्य कसे व्यवस्थित राहिल याची खबरदारी आम्ही घेतली आहे. कुणीही काहीही सांगितले तरीही आमच्यावर कुठलीही कारवाई केली जाऊ शकत नाही. शरद पवार हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सुनील तटकरेंची नियुक्ती प्रफुल पटेल यांनी केली आहे. मी पण पक्ष स्थापन झाल्यापासून भुजबळांच्या नेतृत्वात काम केलं. काल मला जी माहिती मिळाली त्यात सुनील तटकरेंची नियुक्ती पटेल यांनी केली आहे. काही मान्यवरांची अशी वक्तव्यं आली की आम्ही कायदेशीर मार्गाने न जाता जनतेत जाऊ. पण रात्री बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन वेगळ्या घटना सांगण्यात येत आहेत. त्याला काही अर्थ नाही. आम्ही जी भूमिका घेतली आहे ती योग्य, चांगली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भल्याची आहे, असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांना सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. हकालपट्टी करण्यासाठी आमचा पक्ष काढलेला नाही. आम्ही बेरेजचे राजकारण करतो आणि पक्ष वाढवतो. आम्ही इथे काय हकालपट्टी करायला बसलो आहोत का? असे अजित पवार यांनी सांगितले.शरद पवार यांनी बंड करणाऱ्यांना जागा दाखवली जाईल असं म्हंटलं होतं, त्या प्रश्नावरही अजित पवार यांनी उत्तर दिले. आपल्या राज्यात आपल्या देशात पक्षाबाबत असे काही प्रश्न निर्माण झाले तर त्या संदर्भातला अधिकार कुणाला आहे, तर तो निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक तिथे सांगतो पक्ष कोणाकडे आहे, चिन्ह कोणाकडे आहे. त्यासंदर्भात आपल्याला तिथे कळेल. आम्ही म्हणजे पक्ष आणि त्याप्रमाणेच आम्ही पुढे चाललो आहोत. आम्हाला या भानगडीत पडायचे नाही. केवळ महाराष्ट्राच्या हितासाठी आणि आमच्या आमदारांच्या हितासाठी आम्ही ही भूमिका घेतली, असेही अजित पवार म्हणाले.