सीबीएससीच्या शाळेतसुद्धा मराठी विषय सक्तीचा करण्यात यावा असा प्रस्ताव नागपूर जिल्हा परिषदने पारित केला असून तो राज्य सरकारला पाठवला जाणार आहे. अशाप्रकारचा प्रस्ताव पारित करणारी ही पहिली जिल्हा परिषद आहे.
मराठी शाळांकडील कल कमी होत असल्याने मराठी भाषेपासून विद्यार्थी दूर जात आहेत. मराठी भाषेला पुन्हा वैभव प्राप्त व्हावं आणि राज्यभाषा म्हणून ती सर्वांना यावी, अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. मात्र आता सीबीएससी शाळा वाढत असून या शाळामध्ये ‘मराठी भाषा’ हा विषय ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मराठी विषयापासून विद्यार्थी दूर जात आहेत.आता तर ग्रामीण भागात सुद्धा सीबीएससीच्या शाळा होत असल्यामुळे मराठी विषयच मागे पडण्याच्या मार्गावर आहे.
मराठी भाषेला वैभव प्राप्त व्हावं म्हणून सीबीएससीच्या शाळेत मराठी विषय सक्तीची करावी असा ठराव पारित करण्यात आला असून तो राज्य सरकारला पाठवून त्याचा पूर्ण पाठपुरावा करणार असल्याचं नागपूर जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती यांनी सांगितलं आहे.
मराठीला वैभव प्राप्त व्हावे हे प्रत्येक मराठी माणसाला वाटते पण त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. आता जिल्हा परिषदने पारित केलेल्या या ठरावाला किती महत्व मिळते हे वेळच सांगेल.